Saturday, February 19, 2011

ट्रेक माणिकडोह........

विवेक आणि हरेश दोघेही ट्रेक ला गेले , इथे समीर आणि विन्या परीक्षा देताहेत ....
आपण मात्र काय करायचं ???? अस नेहमीचा प्रश्न घेऊन दिन्या दारात उभा .......

मी त्याला म्हणालो सध्या झोपा काढ ... दोघांच्या परीक्षा संपल्या म्हणजे आपणही जाऊ ट्रेक ला .....
तसा तो जरासा खुश झाला आणि घरी जावुन ट्रेक च्या तयारीला लागला  .....

आता तसे मलाही तयारीला लागणे भाग होतेच म्हणायला ....
कारण जुना टेन्ट आता भरपूर झीझला होता.... नवीन आणायचा होता ... भरपूर शॉपिंग करायची होती .....
मग दिन्यालाच घेऊन गेलो आणि सगळी तयारी करून घेतली ....

समीर आणि विन्या परीक्षा देऊन आले आणि आम्ही असे चौघे निघालो ...
विवेक आणि हरेश ह्यांना आम्ही मधल्याच पोइन्टला  गाठणार होतो ....

ह्या टोळीचा म्होरक्या मीच .. नकाशा, टेन्ट, ब्याटरी, दोऱ्या माझ्याच कडे ...
म्याग्गी , पाणी , फस्ट एड , डिशेस. भांडी .. बाकींच्या कडे ....

बोलता बोलता आम्ही गाडीतून खाली उतरलो ... आणि माणिकडोहच्या   मागच्या बाजूला उतरलो ....
माणिक डोह म्हणजे जुन्नर मधील एक मस्त ठिकाण .....
पाणीच पाणी आणि आजूबाजूला ट्रेकर्स ला खुणावणारे उंचच उंच डोंगरकडे .....हिरवळ .... मस्त सगळे ...
ह्या आधी इथे आम्ही आलो न्हवतो .... म्हणजे मी सोडून बाकीचे ...
मी लहानपणी आलो होतो , शिवनेरी ,नाणेघाट ....वगैरे वगैरे पाहिले होते....
....
इतक्यात दिन्या ने समोरचा  बोर्ड वाचला ..." इथे बिबटे आढळून येतात .... कृपया गटाने फिरावे ..हातात काठी अन्यथा आणखी शस्त्र बाळगावे .." झाले ..... दिन्या अगदी गार पडला ....
कसाबसा त्याला समजावून आम्ही  पुढे निघालो ... माणिकडोह च्या बाजू बाजू ने आम्हाला नाणेघाटात जायचे होते ....
दुपारी उन जरा जास्तच लागत होत ... इतक्यात पाणीही संपले होत .....
समीर बाटल्या भरायला ...  पाण्याकडे गेला आम्ही तिघे इथे जरा सावलीला बसलो .....

इतक्यात दिन्या आणि विन्या जरा हलके होऊन आले .... आणि माझीही एक डुलकी झाली ....
समीर ने जरास पाणी तोंडावर टाकून मला उठवले .... आणि आम्ही परत निघालो ..... आता चढण जरा जास्त होती ... झाडंही दाट होऊ लागली होती ....
विवेक ला फोन करून आम्ही  विचारले कुठय आहे ते ... आणि मग त्यांना गाठायला आम्ही सर सर निघालो .....

पिंपळगाव जोगा धरण आणि माणिकडोह ह्या मध्ये एक डोंगररांग आहे .... त्यात अगदी मधला असा एक डोंगर चंद्रासारख्या आकाराचा आहे ....
तिथेच विवेक आणि हरेश थांबले होते .....
आम्ही जवळ पास पोहोचलोच होतो इतक्यात चढताना दिन्याचा पाय मुरगळला ......

आई ग .... आता काय ... स्प्रे मारा आणि निघा ... संध्याकाळ होत आली यार ... थांबून उपयोग नाही ,......
we have to move .... ... दिन्या बिचारा रडत कढत चालू लागला ......

आला आला डोंगर जवळ आला ....
इतक्यात लांबून कुणी येताना दिसले ......
दिन्या जरासा फुलला होता ......
कसला आता तर एकदम सुपरमेन झाला होता .... कारण समोरून  .... विवेक आणि हरेश नाही तर दोन सुपर डुपर फट्याक पोरी येत होत्या .... त्याही ट्रेकर्स होत्या बहुतेक ...

पण फार त्रासिक दिसत होत्या ... एकीला गुडघ्याला काही लागले होते ....त्यांना पाहून दिन्या अगतिक होउन जवळ गेला अगदी आमच्या आधीच ......
थोडीसी विचारपूस झाल्यावर कळले की त्यांची चुकामुक झाली आहे .... त्यांचा ग्रुप त्यांना सोडून निघून गेले .....

ह्या मुली न अश्याच असतात ....नेहमी उशीर मग आणखी काय करणार ते ग्रुप वाले .... विन्या ने नेहमी प्रमाणे काडी टाकली ....
तितक्यात त्यातली व्यवस्थित असलेली शमिका ,,, विन्या ला म्हणाली ... , " रात्री , आम्ही झोपेत असताना .... एका बिबट्याने आमच्या  कॅम्पवर हल्ला केला .... त्यात सगळ्यांची पांगापांग झाली ....
आणि तसेच त्यात मग आमचे मोबाईल आणि साहित्य असेच तिथे पडून राहिले ..... आता आमच्या कडे काहीच नाही ..... अंगावरच्या कपड्याशिवाय ... '' आणि अक्षरशः ती रडू लागली .....

त्यातच त्या हीना ला मार कसा लागला ह्याचे कळले .... मग काय त्यांना आमच्यात सामील करून आम्ही विवेक आणि हरेश  ला .... गाठायला निघालो ....
आता पर्यंत त्या मुलींनी आमच्या मोबाईलवरून घरी आणि इतर ग्रुप वाल्यांना कळवले होते ....आम्ही आता विवेक आणि हरेश ला गाठून कॅम्प बंद करून घरी परतणार होतो ....

संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ..... तो चंद्रकोरी डोंगर भेटला ..... आम्ही सगळे इकत्र भेटलो ....
आणि सगळी माहिती सांगून आता परतीची वाट धरू लागलो ....
खरं  तर तिथे बिबट्याने हल्ला केला म्हणून जास्त धमक करायची सोडून आम्ही परतण्याचा निर्णय घेतला .....
आता पर्यंत त्या दोघी आमच्यात भरपूर मिसळून गेल्या होत्या .... हसत खेळत आम्ही चालत होतो ....
बोलता बोलता आता रात्र झाली होती .....
आम्ही टेंट लावले .... मुलींना टेंट मध्ये झोपायला सांगितले .... आणि उरलेले दोघे कॅम्पफायर कडे लक्ष देतील असे ठरले ....
भूक हि लागली होती ..... पाणी वगैरे काढून आम्ही मेग्गी तयार केली .. पोटभर खाल्ली ... आणि गाणी वगैरे बोलून थकून मग झोपायला निघालो ....

विवेक आणि हरेश हे जागणार होते ....

रात्री ११.३० च्या दरम्यान ....अचानक टेंट च्या मागे कसली तरी हालचाल दिसली  ......
विवेक ने शिटी वाजवून  सगळ्यांना जागे केले ......
आम्ही टेंट मधून बाहेर आलो बघतो  तर काय ..... तीन बिबटे एकमेकांत भांडत होते .... आगीमुळे ते जवळ येत नव्हते .....
दिन्याची तर बोबडीच वळली .... विवेक आणि हरेश हुश्शार झाले .... समीर ने काठी हातात घेतली ... विन्याने बेटरी त्या बिबट्यांच्या डोळ्यात मारायला सुरुवात केली .....
इतक्यात मी सुरी काढून हातात धरली ......
जवळ पास अर्धा  तास हा खेळ चालला .... त्यांना हुसकावण्यात  बराच वेळ गेला ....
पण त्या टेंट मधील पोरी अजून बाहेर आल्या नव्हत्या ......
ते बिबटे गेल्यावर आम्ही टेंट मध्ये पाहिले तर मुली गायब ...?????

कुठे गेल्या असतील ???

शोधाशोध सुरु .. आम्ही टेंट वगैरे बांधून  त्यांना शोधायला निघालो ....तेही अगदी गटाने ...... एक एकटे नाही .....
बर्याच वेळा नंतर .... कुणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू आला ..... जवळ जाउन पाहतो तर ...हि तर हीना ..... हिचा गुडघा जखमी असून हि इतकी का पळाली ..??
बर्र शमिका कुठेय .? ती इतकी गप्प झाली कि काहीच बोलत नव्हती .... आम्हाला वाटले काही तरी वाईट घडले असेल ....
काही वेळा नंतर ती बोलली कि शमिका पुढे पळाली .... मग हीना ला पाठमोरी घेऊन .... समीर आणि आम्ही निघालो .....
समीर दमला कि विन्या घेई  मग हळू हळू ते माझ्यापर्यंत येई .... दिन्या वाचला कारण तोही पायाने चुकला होता ना ....
२.३० वाजता शमिका सापडली .... अगदी विव्हळत होती ती .... बघतो तर तिच्या पायाला ..सापळा होता ..... त्याने तिचा पाय पूर्णपणे जखमी  केला होता .....
मग काय तिला त्यातून सोडवले .... दवा पट्टी केली .... आणि निघालो तिला हि पाठमोरी घेऊन ....
काय हालत झाली होती म्हणून सांगू .... कशाला इतकी मदत करत होतो त्या मुलींची काय ठाउक .???....
पण तरी आता ते विधिलिखित असेन असे मानून .... चालत राहिलो ... आता रस्ता दिसू लागला होता ..... कारण काही गाड्या येत जाताना दिसत होत्या ..... आम्ही आता जंगल सोडले होते .....
माणिकडोह धरणाच्या बस स्थानकाजवळ एक छोटेखानी घर होते तिथे आम्ही थांबायचे ठरवले .... 
त्या मुली एकदम गप्प झाल्या होत्या .. कुणीच कुणाकडे पाहत नव्हते फक्त त्या घराकडे कूच करत होतो ...
अचानक मला जाणवले कि पाठीवरचे ओझे अगदीच कमी झाले आहे .... मी लक्ष दिले नाही ......  वाटले आता सवय झाली असेन .... दोघींना त्या घराजवळ उतरवून हवे तर आराम करू ....
तितक्यात समीर म्हणाला .. ," अग हीना तू इतकी हलकी कशी झालीस ग ?"
काहीच आवाज नाही .... मी बघतोय तर हीना आहे कुठे  त्याच्या पाठीवर ???? ," सम्या अरे ती हीना कुठेय ?"
" कुठेय म्हणजे ? हि काय पाठीवर ... " असे म्हणत त्याने पाठी पाहिले तर एक मेंढरू त्याच्या पाठीवर होते ....
तसेच एक माझ्याही पाठीवर होते ...... दोघांच्याही हृदयाचा ठोकाच चुकला ..... दिन्याने तर जीन्स ओलीच करून टाकली .....
घाबरलेले आम्ही ती मेंढर तशीच सोडून पळत पळत त्या घरापाशी पोहचलो ....
आमचा आवाज ऐकून घरातला एक माणूस बाहेर आला ...
पाणी पाजून त्याने अगोदर आम्हाला शांत केले ... अन मग विचारले काय झाले ते .....
त्याला आम्ही सगळी हक़िकत सांगितली ....
त्यावर तो म्हणाला ..... " काय फजिती करून घेतली पोर्र हो ....अस जंगलात कुणी पोरी घावत्यात होय ...?? अरे हडळी होत्या त्या .... अन ते बिबटे नव्हते काय .... जादू टोना होता .... नाहीतर त्यांनी तुम्हाला असेच सोडले असते काय ??? हे काय तुमच्या सोबत नाही झालं ... ह्या बाजून जाण्याऱ्या चार पाच लोकांसोबत  झालाय ते ..... तुमी उगाच गेलात ह्या बाजून ...."

त्याने सांगितलेले पटले ही .....पण मग त्या हडळींनी आम्हाला काही का केले नाही ...??? बर्र मोबाईल मध्ये केलेले कॉल पाहिले तर काहीच एन्ट्री  नव्हत्या .. असे कसे ..????

हाच विचार करत करत आम्ही घरी पोहचलो ......  भूत बित काही नसते ... असे मनोमन ठरवत .... झाला प्रसंग सारे विसरण्याचे ठरवून आम्ही पुन्हा रात्री भेटलो ....

आता पुन्हा पुढच्या महिन्यात ट्रेक तोही ..... पुन्हा माणिकडोहच ....!!!!!!!!!!!! बघू त्या हडळी  भेटतात का ????

:- सुजित ( धवल ध्रुव )

Friday, December 24, 2010

माझं शालेय काव्य संमेलन

माझं शालेय काव्य संमेलन


सकाळ सकाळ भाच्याने मला विचारले .....

मामा तुम्हाला कविता येते न हो .....मग जरा करा कि उगवती वर एकाध कविता .......

बाप रे ...मी डोळेच का उघडले ह्याचा शोध घेत होते ....आणि त्या रवीचा ह्या कवीशी काय संबंध आहे तो ? ते जाणून घ्याया लागलो ....
आता कुठल्याही क्षणी कविता कर अस म्हणणे म्हणजे सुलभ मध्ये बसून आर्त  भैरवी  गाण्यासारखे  आहे .....
म्हणजे जवळ पास शक्यच नाही ....
एकाध  वेळ काहींनाच जमते असे आहे ते .....

तरी नाही नाही म्हणता मला माझ्या भाच्या समोर .....माझी सारस्वत अशी प्रतिमा बनवायची असल्या कारणाने ....मी काही एक ओळी केल्या
उगवतीच्या ठिकाणी मी त्याला जवजवळ मावळूनच टाकले .....
बघ हा नीट लक्ष  दे ,आणि तसे ते दुसरी मराठी इयत्ता शिकणारे मुल माझे कवन ऐकू लागले ....
"हा सूर्य मावळतीचा
क्षणार्धार्त लांबला
डोईवरुनी  गेला अन
सागरात विसावला ,,,"

इतक्यात हा ....," मामा मी सूर्य उगवण्याची बोलत होतो ....."
आताचे शालेय मुले हि इतकी चाप्टर असतील ह्याची मला इत्यंभूत प्रचीती आली ...

अरे पुढे तरी ऐक ....
" त्याच्या त्या उष्ण झळा ही
झाल्या शिथिल संध्याकाळी
रात्रीची पांघरून  शाल
पुन्हा सकाळी उगवला ...."

बघ उगवला ना ......? मी आपला उगाच प्लासी ची लढाई जिंकल्यासारख तोंड करून बोललो ... तर ते ही आभार प्रदर्शन करण्यासाठी मांडीवर झोपलं.

चला माझ एक काम तर झालं ...
शब्द देखील कधी दगा देतील याची काही वेळ नाही .....तुम्हाला सांगतो ... रजा घेण्यासाठी  मायना नक्की काय लिहावा ह्यात कमीत कमी दोन अडीच तास घालवणारा मी ...... तिच्यासमोर मेघदुतातला कालिदास बनतो ..... तसे पत्र लेखन वाईट नाही माझे पण ....अजून एकही पत्राचा होकारात उत्तर आलेच नाही...... अगदी त्याही .....

परवाच शाळेतून मेल आला होता , कि यंदा शाळेतल्या काव्यसंमेलनासाठी माझा पदस्पर्श व्हावा ........
बापरे .... पदस्पर्श ..??? तो नक्की कुणी केला होता हे जेव्हा विचारले तेव्हा कळले की , सातवीतल्या एका मऱ्हाटी बहाद्दराने ते उतरवले होते ....
सातवी च्या मुलांना आता बाबासाहेब पुरंदरे ... वगैरे चांगलेच तोंडवळणी पडले होते ...म्हणून पदस्पर्श ....
मी न रहावता उत्तरात लगेच लिहून टाकले ' मी आज पर्यंत शाळेतल्या खालच्या पायरी पासून ते गच्चीच्या माळ्यापर्यंत सगळी कडे पदच काय तर थंडीत  पार्श्व भागाचे ठसे देखील उमटवून आलोय .., तर पदस्पर्श वगैरे ते काय ...? नक्की हजर राहणार ....'

झालं चला दुसर एक काम झालं ......

आता त्या दिवशी अध्यक्षीय भाषण मग आपलं नवकवी भाषण म्हणून आजच्या कविता कशा छान आहेत वगैरे वगैरे लिहून आणलेले बोलू लागलो ,
तर इतक्यात उपस्थित म्हातारबुवा म्हणजेच त्या वेळचे नवकवी ह्यांनी मला हटकले ....
की आमच्या काळच्या कविता कश्या यतार्थ होत्या हे पटवून देण्या साठी त्यांनी अक्षरशः माझ्या हातातून  माईक हिसकावून घेतला .....
मी म्हटले हेच काम ह्यांनी त्यांचा अगोदर त्या वेळीही केले असणार .....' काय करू काही दर्दी कवी असतातच इतके आग्रही ...'

तरी मग त्यांचा आम्ही ऐकून घेतले कारण त्यांनी तेच मुद्दे प्रस्तुत केले जे मी तिथे प्रसुतनार होतो ...
प्रत्येक संमेलनात हे असे काही तरी वादग्रस्थ झालेच पाहिजे हे म्हणजे काळ्या दगडावरील रेघच ...

बरे आता पर्यंत सगळे ठीक होते पुढच्या प्रश्नोत्तरातील फेरीत माझी गोचीच होणार होती इतकं नक्की ...
कारण आतापर्यंत माईक चा ताबा घेणारे प्रस्थापित साहित्यिक आता स्नेहभोजन आटोपण्यासाठी जाणार आणि इथे मी ह्या फेरीत मरणार ....हे ही विधीलेखीत ....

समोर बसलेल्या एका आठवी नववीतल्या मुलीने मला प्रश्न केला ...
" काका , तुम्ही वर्गात बसताना अभ्यास करायचे का कविता ...?"
आता तिने  मला काका म्हणणे म्हणजे अगदी कहरच ,
पण तो कहर चेहऱ्यावर  न दाखवता मी शांतपणे म्हणालो ," पोरी मी वर्गात असताना तुझ्या सारख्या सुंदर पोरींवर कविता करायचो "
आता ती ही जराशी वरमली होती , इतक्यात नेहमी टारगट ह्या गटात मोडणाऱ्या मुलाने उठून प्रश्न केला,
'' दादा , मी काय म्हणतो कविता लिहायची म्हणजे कशी रे ...?"
जरा हायसे वाटले .....,"
" अरे हाताने पेन धरायचा आणि मनाने शब्द रेखाटायचे .. झालं की मग तुझी कविता ..."
आणखीन एक गटणे ह्या प्रकारात मोडणारा रसिक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला ," कविवर्य "
मुळात आता हा पुढे काय बोलणार ह्याची मी पु लं ना वाचून तयारी केलीच होती ....
तर हा ," कविवर्य , माझ्या साहित्य जीवनात मी तुमची बरीचशी पुस्तके वाचून काढल्या नंतर असे आढळून आले की आपण बहुदा प्रेमकाव्य जास्त लिहिले आहे ...तर इतर कविता आम्हास कधी वाचावयास मिळतील...?"

मी पुरता ठार झालो ह्या विधानाने ....म्हणजे माझे पुस्तक मी अजून काढले नाही आणि ह्याने ते वाचूनही काढले म्हटल्यावर गटणेचा  बाप कोण ? ह्याचे उत्तर साक्षात हाच .....
" अरे मित्रा माझ्या ओर्कुट आणि फेसबुक वरील कविता वाच म्हणजे तुला कळेल की मी फक्त प्रेम काव्य वगैरे लिहित नाहीच मुळी ....आणि इतर कविताही तिथेच आहेत तू नक्की पहा ..."
ह्यात त्याला काय हर्ष झाला कुणास ठाऊक .... ते उगाच उडी मारून जागेवर बसलं .....
आता पर्यंत येणाऱ्या जवळजवळ  सर्वच प्रश्नातले  हे काही निवडक प्रश्न  होत ..बाकीचे तुम्ही विचारू नका कारण मुद्द्याबाहेर सहसा मी बोलत नाही आणि लिहितही  नाही .....

एक प्रमुख प्रश्न  जो मला प्रकर्षाने जाणवला आवडला तो म्हणजे
" मी नाशकात अगदी शिरवाडकरांच्या तसेच मुंबईला पु लं च्या आणि त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाउन तिथे कविता लिहिण्याचा प्रयास केला ...
पण ते शक्य नाही झाले असे का होते ..?"
मला क्षणभर  हसूच आले .... हे म्हणजे मारुतीच्या देवळात गेल्यावर बारा हत्तींच बळ अंगात येते असे म्हणण्यासारखे ,
तरीही त्या भाबड्या प्रश्नाला त्याच्या निरागसतेचा लेप होता ....
मुळात ह्यावर मी ही काय ते उत्तर देऊ शकणार होतो  देव जाणे .....
...........................................................................................................
जरा २ ३ मिनिटांनी मी प्रयत्न केला ...." बघ हा कसे असते .... आपण ज्यांच्या ठिकाणी जातो त्या माणसांना अनुभवण्यासाठी ....त्यांचे विचार त्यांचे आचार समजण्यासाठी किव्वा आपल्यात भिनवून घेण्यासाठी ...
म्हणून मुळात आपण त्यांच्याच सारखे लिहू शकू हे काही शक्य नाही .. कवितेला, विचारांना मुळात स्थळ ,काळ, वेळ, पंचांग आणि मुळात म्हणजे ग्रहांची दशा अनुकूल नसतेच कधी ..
ते कधी तुमच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडतील तुम्हालाच कळणार नाही ...... त्या साठी फक्त मनाचा गाभारा मोठा करा ......म्हणजे विचार आपोआप तिथे वास करू लागतील शब्द राज्य करू लागतील .....
माझी आई म्हणते,' आपण झोपतो म्हणजे आपल्यातला आत्मा आपण मोकळा करतो ..स्वप्न म्हणजे आपल्या आत्म्याने इहलोकात केलेलं भ्रमण असते ....आणि तो जसा आपल्या शरीरात पुन्हा शिरतो तेव्हा आपल्याला जाग येते ....' तर कविता, लेख हे असेच आपल्या आत्म्याने केलेला आपल्याशी संवाद असतो ... तो तुम्ही मुद्दाम घडवून आणू शकत नाही .. त्या साठी मनाची अवस्था निर्माण व्हाही लागते .....मग तुम्हाला आपोआप सारे काही लिहिता येईल अगदी भागवत गीता देखील !!, ती ही कधीच न वाचता......... कारण त्यातच लिहिलंय आत्मा अमर आहे तो इहलोकात कुठे ही कधी जाऊ  शकतो .....मग तुम्ही ती वाचली असो किव्वा नसो त्याचे विचार आत्मा तुमच्या पर्यंत खेचून आणेलच ....कविता ही जशी अवस्था असते तशीच ती व्यक्त करण्याची म्हणजेच लिहण्याची व्यवस्था तुमच्यात  असावी लागते ....
जरा माझ्या ह्या त्रिवेणीत विशेष लक्ष द्या बर्र का ....
' का लिहाया लागलो कळलेच नाही
कधी लिहाया लागलो तेही कळले नाही .....
..
.
.
.
कवी होणे हातातल्या रेषेत नसते लिहिलेले ...'

म्हणून म्हणतो नुस्त स्वप्नात जगण म्हणजे काव्य करणे नाही ते लिहून ते  इतरांपर्यंत पोहचवण हे देखील महत्वाचे ....
म्हणून तू जे काही प्रयत्न केलास तो  भौतिक होता, तू  आत्मिक प्रयत्न कर जागेवरच तुला पु लं आणि शिरवाडकर नक्कीच हातात हात घालून भेटतील ...
मुन्नाभाईच्या गांधी सारखे .......... कारण त्या साठी तो रोग ही स्वतःला जडवून घ्यावा लागतो रे .... काय म्हणतात तो .....केमिकल  लोचा ..."

आणि संमेलन तूर्तास संपले ..............

;- सुजित ( धवल ध्रुव ) 

Tuesday, November 16, 2010

कारण ती वेळच तशी होती ...



आज तुला तिथेच
पुन्हा तिथेच बसायचे होते ....
अगं आज तिथे कुणी दुसरे जोडपे बसलेय ...
नाही मला तिथेच बसायचेय .....

मग काय गेलो तिथे आणि
खरच उबळ आल्यागत केले ..
बिचारे नुसतेच घाबरून
अगदी लांब पळाले...

तू ना खूप खूप जिद्दी आहेस बघ ....

रोमेंटिक बघा हा ....
त्या दगडावर फक्त एकालाच
आणि एकालाच टेकवता येईल
अशी इतकीच जागा ..
मी बसावं मग तिने मांडीवर ...
आणि समोर अथांग सागर .....

तिला खांद्याने धरून मी उगाच
माझ्या कविता ऐकवायच्या ...
तिने हि न ऐकताच नुसत्याच
वाह वाह म्हणायचं ...!!!

ती तर नुसती माझ्यात गुरफटलेलीच असायची ......

इतके होत असताना
कधी नव्हे तो आज डोक्यात
एक ठिणगी पेटली ...
तिचे ओठ पाहून
माझेही ओठ आपसूकच सरसावले ...

बस्स एकदाच
कारण फक्त ठिणगी पेटली होतीना
आग नव्हती लागली ना ..

पण त्या दिवशी संद्याकाळी
तिला घरी सोडले आणि
पुन्हा बाय करायला गेलो तर ...
ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती ....

" अग आज १ किस झाली ग ...
तिथून - काय म्हणतेस मग पुढे काही .....?
हि- नाही ग तसे काहीच नाही .....
-अग काय ग मग कुठे एकांतातच जायचं ना ...
हि - अग पण तो बावरला ना ,.. मग काय आले घरी परत ...."

जरास्स बर वाटलं अन नाहीही ....
ती याच क्षणाची वाट बघत होती ....
पण मी नुसताच बावरलो ...
कारण ती वेळच तशी होती ...

तिने मला बघून प्रेम केले कि
नुस्त माझ पौरुष्य पाहिले...
स्त्री म्हणून तिने मला
पुरतेच मदहोश केले .....

आता नाहीच वाटत
तिला पुन्हा भेटावासं
आणि जाहलेल्या आठवणी
नुस्त आठवांवासं ....

कारण मी वासना
कधीच उफाळली नव्हती
नुस्त आणि नुस्त
निर्मळ प्रेम केले होते ....

:- सुजित ( धवल ध्रुव )...

नऊ रात्र..............



हार्दिक आज गरबा खेळायला येणार ना रे .............?
म्हणून तिने अवचितच फोन केला ...
ह्यानेही हा म्हणून मोठा सुस्कारा सोडला .....

क्षणभर काहीच कळले नाही हे असे का ते .......

गरबा इतका आवडू लागला
आमच्या मराठी मुला मुलींना ??
काय बाई देवीचीच कमाल ......

रात्री ११ नंतर सुरु व्हायचा गरबा यांचा ....
रास रंगायचा रास बहरायचा ..
सगळे जोडीने खेळायचे ....
दमायचे मग आपापल्या जोडीदारासोबतच
थोडी विश्रांती घ्यायचे जोडीदारासोबतच...

हा हार्दिक तर नऊ रात्र नऊ जोडीदारांसोबत ....

भारी गरबा इंटरेस्टिंग वाटू लागला
आणि मग आमचाही पाय निघू लागला .....

जशी रात्र गडद झाली .....
जोड्या हळू हळू पांगू लागल्या ....

आतापर्यंत मंडळात खेळणारे हात
आता मेडिकल स्टोर शोधू लागले ....

गाड्या भरत राहिल्या
निघाल्या मात्र कुणीच नाही .....
गाड्या नुसत्या हलू लागल्या
ए सी ने नुसत्याच घाम भरू लागल्या ..
बाईक वाले अंधारात गडप ......
पण आवाज मात्र करू लागल्या .....

झाले निघाले सगळे घरी आता ......

काल रात्री गरबा फारच छान रंगला होता ..
पूर्वार्धात आणि उत्तराधार्त ...

सकाळी हार्दिक च्या आईला
त्याच्या कुडत्यात कोंडमचे पाकीट सापडले
तो घाईत विसरलाच होता .......


आता कळले नऊ रात्र हा हार्दिक काय करत होता ........??


:- सुजित ( धवल ध्रुव )

म. सु :- १ ) वरील लेखातील / काव्यातील " हार्दिक " हे पात्र पूर्णपणे काल्पनिक दोष आहे , त्याचा कुणीही स्वतःशी संबंध जोडू नये ...
२) काय आहे!! उगाच गरबा खेळल्याने अथवा रमल्याने देवी पावत नाही ...... ती कशी पावते ..ते इथे कळलेच असेल ...
३) म्हणून एक दोन इट्स ओके पण सवय गरज झाली तर हार्दिक तुम्हीही व्हाल .....म्हणून या 'हार्दिक' नावाच्या पात्राशी सावधान .....!!!
४ ) चूक भूक द्यावी घ्यावी ...

ईssस्टाइल




बाब्या चवथीला होता
तेव्हा त्याने जराशी उष्टी बिडी सुलगावली होती ....
आज बाब्या चार पाकीट संपवतो ...
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

आता बाब्याला काय सवय होतीच असे नाही
पण हे ओढताहेत ते ओढताहेत म्हणून
आपसूकच परंपरागत ते बाब्याकडे आले
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

म्हणाल तर बाब्याला अजून मिस्रूढ फुटली नाही
आणि खालचं म्हणजे चपलेच माप हि
बापाएवढं झालं नाही , तरी त्याच्यासमोर हा ओढतो
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

क्रीतेक समजावून गेले
क्रीतेक त्याच्यात सामील झाले ....
कोणासमोर कधी किती आणि कशी ओढावी ते हि शिकताहेत
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

बाब्या इथेच नाही थांबला
त्याने तर दुसरी हि बया केली आहे जवळ
रोज चार खंबे हवे असतात याला म्हणे स्वर्ग सुख
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

आता विचार कराल एवढ्या सार्या साठी पैका
येतो तरी कुठून , अरे कुठून काय विचारताय
राजकारणी,मवाली, गुंड ह्यांच्यासारख्यांच्या तिजोरीतून ...
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

बाब्या म्हणे आजकाल एरियाचा झाला आहे भाई !!
.
.
.आता काय त्यालाही सलाम करायचा
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...

:- सुजित ( धवल ध्रुव)


म. सु :- १ ) वरील लेखातील / काव्यातील " बाब्या" हे पात्र पूर्णपणे काल्पनिक दोष आहे , त्याचा कुणीही स्वतःशी संबंध जोडू नये ...
२) काय आहे!! उगाच बिडी सिगारेट दारू घेतल्याने ....तिचा नुसता खप होतो ... आणि आपल्या आयुष्याचा वेगवान खप होतो ....
३) म्हणून एक दोन इट्स ओके पण सवय गरज झाली तर बाब्या तुम्हीही व्हाल .....म्हणून या 'बाब्या' नावाच्या पात्राशी सावधान .....!!!
४ ) चूक भूक द्यावी घ्यावी ...

Monday, October 4, 2010

( वाय टू के ) नवीन जनरेशन




राउंड मारून येतो म्हणून आईला त्याने फसवले ....
दळण आणायचे सोडून तो तिला भेटायला गेला ...
क्लास तर कधीचाच संपला होता....
हि अजून कशी आली नाही ?
होता होता राउंड याचा खूप वेळ घेउ लागला ...
६.३० ला गेलेला हा अजून कसा नाही आला ?
म्हणून आई इथे काळजीत .....
आणि हा तिच्या .........

गेल्या वर्षी नापास झाला
आणि याच वर्गात बसला
मित्रांनी विचारले तर म्हणाला
अरे हि नाही का आता रोज दिसणार वर्गात ?
नापास होण्याचा आनंद ह्याला इतका काही झाला ....
कि साला रडायाचे सोडून हा तर पार्टी देऊ लागला ....
काही का होईना त्याचे नापास होणे फळले ....
आणि उशिरा का होईना पास झालेले सारे जन जळले ....
रोज हा तिच्या सोबत गणितं सोडवत बसायचा ..
विज्ञान वगैरे विचारू नका हा तर प्रात्यक्षिक हि द्यायचा ...
हळू हळू दोघानांही विज्ञान जरा जास्तच लागले कळू
आणि मग पौगंडावस्था यांनाही लागली फळू ...
..
..
..
एकदा ..
..
मधल्या सुट्टीत एकाने
बाथरूम मध्ये पाहिले ह्यांचे प्रात्यक्षिक
आणि काही कळायचे तर सोडा
हा घाबरून पळत सुटला प्रासंगिक
जाउन त्याने मास्तरांना सांगितले
आणि मास्तरांनी हि दोघांना विचारले ...

समित्या बसल्या .. वोटिंग झाले ....
बिचारे दहावी अगोदरच पास झाले ....

मग काय आता ह्यांचे भेटणे
कुणालाही रास्त नाही ..
दोघांनाही कळले कि करावे पण
लिमिट पेक्षा जास्त नाही .....

:- सुजित ( धवल ध्रुव )

Monday, September 20, 2010



अन उद्याची भेट पुन्हा....

/



ठरवले होते कि चला
आज आठवणीच्या गावा जावे
अन उद्याची भेट पुन्हा
आजच्या जगण्यात ल्यावे ...

सापडतील तिथे तुला
तुझा पहिला वहिला मित्र
झोपाळ्याचा दोरखंड आणि
आट्यापाट्याचे छत्र

थोडे पुढे गेलास कि
शाळा असेलच उघडी
मास्तरांच्या टेबलावरली
लपवशील तू पुन्हा छडी

पटांगणात आल्यावर
आठवेल सकाळचा पाढा
सूर्य नमस्कार आणि
गार वाहणारा तो ओढा

लिंबाखाली बस जरा
तात्या , बुधाजी दिसतील
तुझ्या नव्या अवताराला
कुणब्याच्या पोरी हसतील ...

आडाजवळ ये आता
तो पूर्वीसारखा खोल नसेल
मोट त्याची कधीच काढलेली
अन नुसतीच फिरती रहाट दिसेल ...

मारुतीकड आलास तर
जरा आठव पैलवानकीचे धडे
अन हनम्या मुलाम्याला हरिवलास
तेव्हा खाल्लेले खव्याचे पेढे

माळाकडं फिर आता
उस उभा असल तसाच तवा
नारुश्याची कमळी पहिल्यांदा
थंडीत बिलगली होती जवा

दुपार टळून जाईल
आता घराकडे फिर
जोश्याच्या घरात चा घे
अन मोमिनच्या घरात खा खीर ..

सांज सरून गावकरी
जेव्हा घराकडे येतील
छुन छुन पैंजणाने मग
जीव शिवा परततील ..

दिसलं चांदण मुलखाच
अन चांदण्याबी भारी
अरं गाव सोडून शहरामंदी
नसते जीवन वारी ......

:- सुजित ( धवल ध्रुव )